युवक व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाची कृतिशील चळवळ :
जगातील सर्वांत युवा देश म्हणून आपल्या देशाची ओळख आहे. ही युवाशक्ती देशविकासात मोलाची भूमिका बजावू शकते. डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी पाहिलेले महासत्तेचे स्वप्न सत्यात उतरवायचे असेल तर या देशातील भावी पिढी अधिक सक्षम निर्माण व्हायला हवी. अंगभूत कलाकौशल्यांचा विकास करून बौद्धिक क्षमतेवर या पिढीने कर्तृत्वाचा ठसा उमटविणे आवश्यक आहे. भविष्यातील आव्हानांचा सामना करण्याची क्षमता त्यांच्याकडे असावी. हे सर्व काही शिक्षणपद्धतीवर अवलंबून आहे. तंत्रज्ञानाच्या युगात कालानुरूप शिक्षणाचे स्वरूप बदलले. त्याप्रमाणात विद्यार्थी-पालकांचा गोंधळही वाढला आहे. शिक्षण आणि करिअरबाबत विद्यार्थ्यांना पुरेशी माहिती मिळत नाही. म्हणूनच अनेक प्रतिभावान आणि हुशार विद्यार्थी विकासप्रवाहाच्या बाहेर फेकले जातात. ही सामाजिक समस्या लक्षात घेऊन स्वयम् सामाजिक संस्था आणि माय करिअरच्या माध्यमातून मी शैक्षणिक चळवळ सुरू केली आहे.
समाजात एकीकडे सोयीसुविधांची रेलचेल तर दुसरीकडे होतकरू आणि हुशार विद्यार्थी मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. हा मोठा विरोधाभास आहे. हल्ली ठरावीक अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा कल असतो. विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहे. देशात दिवसेंदिवस शिक्षित बेरोजगारी वाढत आहे आणि दुसरीकडे अनेक क्षेत्रांमध्ये कुशल मनुष्यबळ मिळत नाही. चुकीच्या करिअर नियोजनाचा हा परिणाम होय. म्हणून स्पर्धेच्या युगात शिक्षणाच्या योग्य टप्प्यावर अचूक निर्णय घेणे आवश्यक आहे. ऑनलाईन मार्गदर्शनाच्या माध्यमातून विविध भरती परीक्षांची माहिती देऊन ही उणीव भरून काढण्याचा माय करिअरचा उद्देश आहे.